मुक्ताईनगर – प्रतिनिधी
आजच्या स्पर्धेच्या युगात मुला मुलींनी वयाच्या 16व्या वर्षीच आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करून त्या ध्येय पूर्तीसाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा ब्राईटनेस वाढवाण्यापेक्षा आपल्या करिअरचा ब्राईटनेस वाढवावा… आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यशाची उंची गाठावी. महत्वाकांक्षा असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही,सोळावं वर्ष जसं धोक्याचं आहे, तसंच मोक्याचंही आहे.”असे प्रतिपादन मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ यांनी मुक्ताईनगर येथे केले.
येथील जे ई स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर पी पाटील, उपशिक्षक श्री व्ही एम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी श्री खताळ यांनी पहिल्या सत्रात करिअर विषयी तर दुसऱ्या सत्रात कायद्याविषयी मार्गदर्शन केले. करिअरविषयी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक कुटुंबातून समाजाची निर्मिती होते…. खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडतात ते शाळेत गुरुजनांकडून. समाज व्यवस्था सुरळीत चालावी, नागरिकांना सुरक्षितता वाटावी यासाठी पोलिस असतात. समाजाचं नियमन पोलिसाप्रमाणे शिक्षकही करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यास ते व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देते. ‘कमवा आणि शिका’ या तत्वातूनही काही गोर गरीब मुले मुली यश संपादित करतात. काही यशस्वीतांच्या यशोगाथा वाचून त्यातुन प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी तारुण्यात मुला मुलींनी सावध भूमिका घेऊन आपल्या हातून गंभीर चुका होऊन करिअरवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणी त्रास देत असेल तर मुलींना चाकू सूरीची आवश्यकता नाही, त्यांनी प्रतिसाद न देता समोरच्याला निक्षुन सांगणे फक्त्त गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी यु ट्यूब वरील मोटिवेशनल व्हीडिओ पाहून करिअर साठी मार्गक्रमण करावे… अवांतर वाचनातून व्यक्तिमत्व घडवावे असा सल्ला उपस्थिताना दिला.
दुसऱ्या सत्रात त्यांनी कायदेविषयक माहिती दिली. मुलांनी धार्मिक, राजकीय पोस्टला शेअर करू नका,घाई घाईत कोणतीच कमेंट नोंदवू नका… जेणेकरून समाजात तेढ निर्माण होईल. तरुणांनी फक्त्त राष्ट्राचा झेंडा…. अर्थातच तिरंगा ध्वज हाती घेण्याचे आवाहन केले. देश, राष्ट्र हीच प्राथमिकता असली पाहिजे.सायबर क्राईम पासून दूर रहा.. बाहेर गावी गेल्यावर स्टेटस लावण्याची घाई करू नका,पोरनोग्राफी मिक्सिग चा अतिरेक टाळण्यासाठी स्वतःचे फोटो अपलोड करतांना हजारदा विचार करा…असेही श्री खताळ यांनी स्पष्ट केले.शेवटी सोबत आणलेल्या वेपनविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विष्णू राणे यांनी केले.