पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांबाबत मोठे विधान केले आहे. निवडणुकांचे फटाके आता दिवाळीनंतरच वाजतील, असं राज ठाकरे म्हणाले आहे. इतकंच नाही तर निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी समाजाचं कारण पुढे करण्यात आलं. पण खरं कारण वेगळंच असल्याचं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यसरकार वेळ मारू मारून नेत असल्याचे ठाकरे म्हणाले आहे.
सगळं खोटं’ ओबीसी समाजाचे कारण पुढे..
निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. आता तुम्हाला बरोबर ते कळलं असेल. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला ती वातावरणात दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं. यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, दुखण्याबाबत बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे म्हणजे जून, धो धो पाऊस.. सामान्यांना निवडणुकांचं काही देणं घेणं नाही. निवडणुका फक्त उभं राहणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. साला आपली कापली जाते की राहते.अशी टीका देखील राज ठाकरेंनी केला आहे.
व्यक्त झाले राज ठाकरे
दोन वर्षे कुठेही भाषण केलं नाही. मुलाखती दिल्या. कुठे पाच मिनिटं बोललो, दहा मिनिटं बोललो पण भाषण नाही दिलं. दोन वर्षापूर्वी आपण आझाद मैदानावर मोर्चा काढला तेव्हा माझं शेवटचं भाषण. त्यानंतर दोन वर्षात मी ही बोललो नाही, तुम्ही पण बोलला नाहीत. आज आपल्या पक्षाला 16 वर्षे पूर्ण होत आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. इथून पुढची वाटचाल आपण चांगली करू असा विश्वास देतो. लॉकडाऊन झालं, कुणी विचार केला नसेल की या प्रकारचे दिवस आपण पाहू. रस्त्यावर शुकशुकाट होता. सगळेजण घाबरुन घरात बसले होते. सहज स्पर्श करायलाही भीती वाटू लागली. घरातील माणसाने दिलेला पाण्याचा ग्लासही घेताना संशय वाटत होता. असे भावनिक उदगार राज ठाकरे यांनी आपल्या पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांशी बोलताना काढले.
कोविड बाबत राज ठाकरे म्हणाले
मार्चमध्ये लॉकडाऊन लागला तेव्हा दोन दिवसानंतर माझ्या मुलीला घेऊन मी व्हरंड्यात बसलो होतो. तेव्हा फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता… फक्त पक्षांचे आवाज होते. मला वाटतं की पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महिन्यातून दोन दिवस लॉकडाऊन ठेवा असं सांगावं वाटतं. सकाळी कोकिळा कुहू कुहू ऐवजी कोविड कोविड असं ओरडू लागल्याचा भास होत होता. ती शांतता भीतीदायक होती पण पण कुटुंब जवळ आली. एकमेकांसोबत जेवायला गुप्पा मारायला लागली.असा भावनिक क्षण देखील राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.