जळगाव राजमुद्रा | जनतेच्या उपयोगाकरिता शासनाने दिलेला पूर्ण निधी फक्त विकासाच्या कामी वापरला गेला पाहिजे आणि तो पूर्णपणे वापरून आम्ही विकासाच्या मार्फत विरोधकांना उत्तर देत आहोत. त्यासाठी एका वर्षात आम्ही जिल्हा नियोजन व विकास परिषद (DPDC) अंतर्गत 61 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती राज्य स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जळगाव शहर महानगर पालिकेच्या विकास कामांसंदर्भात शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे आज सकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा आधी मान्यवर आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते.
सदर निधीतून सर्वसमावेशक कामे होणार असून ज्या ज्या वार्डात कामांची आवश्यकता आहे त्या सर्व ठिकाणी कामे पूर्ण केली जाणार आहेत. एका वर्षात DPDC अंतर्गत 96.8 टक्के निधी वापरला गेला असून असा वापर करणारे आपण पहिले पालकमंत्री असल्याचा अभिमानही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावतांना ‘आम्ही कृतीने बोलत आहोत, विरोधकांना उत्तरे द्यायची असतील तर त्यांनीही कृतीनेच उत्तरे द्यावीत’, माजी पालकमंत्र्यांच्या आणि आमच्या कामकाजात विरोधकांनी स्वतःच तुलना करावी असे वक्तव्य केले. महापालिका कोणत्या पक्षाची आहे हा विचार न करता फक्त विकासासाठी आम्ही निधी दिला असून विरोधक स्वतः निष्क्रिय असून आमच्यावर आरोप करत असल्याचेही ते पत्रकार परिषदेत बोलले.
ऑक्सिजन प्लांट संदर्भात विचारले असता 10 कोटी रुपयांची प्राथमिक मान्यता दिली असून या अंतर्गत जिल्ह्यातील दहा प्रमुख रुग्णालयात हे प्लांट आणि रिफिलिंग सुविधा मंजूर करण्यात आली आहे. सदर कामाचा निविदा न काढता वेळ वाचवण्याच्या हेतूने प्रत्यक्ष अनुभवी एजन्सीला ही कामे देता येऊ शकतील का, यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. वेळ वाचवून कमी वेळेत प्लांट उभारण्याचा प्रयत्न असून भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही असे आश्वासनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.