चांदसर येथे स्व.मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण संपन्न
मंत्री महोदय व मान्यवरांसह महापौर सौ.महाजन यांची उपस्थिती
जळगाव राजमुद्रा दर्पण : महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आज जळगाव जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 15 एप्रिल 2022 रोजी चांदसर, ता.धरणगाव, जि. जळगाव येथे स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार दिवंगत मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
‘‘संपूर्ण राज्यात गाजलेली कापूस दिंडी ही जळगावहून नागपुर येथे काढण्यात आली होती. यात लक्षावधी शेतकरी सहभागी झाले होते. या दिंडीच्या यशस्वी नियोजनात दिवंगत मुरलीधर अण्णा पवार यांचा मोलाचा वाटा होता’’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व.मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री मा.ना.श्री.जयंतरावजी पाटील, राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्तजी तनपुरे, माजी मंत्री मा.श्री.एकनाथरावजी खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष मा.श्री.अरुणभाई गुजराथी, शिवसेनेचे आमदार मा.श्री.चिमणरावजी पाटील, मा.सौ.लताताई सोनवणे, काँग्रेसचे आमदार मा.श्री.शिरीषदादा चौधरी, राष्ट्रवादीचे आमदार मा.श्री.अनिलदादा पाटील, माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री.गुलाबरावजी देवकर, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष मा.श्री.अशोकभाऊ जैन, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक, महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन, माजी आमदार मा.प्रा.श्री.चंद्रकांतजी सोनवणे, माजी आमदार मा.श्री.मनीषदादा जैन, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.गुलाबरावजी वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अॅड.रविंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.रोहिणीताई खडसे-खेवलकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या श्रीमती प्रतिभाताई शिंदे, मा.श्री.राजाभाऊ मयूर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.संजयजी पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खा.श्री.शरदरावजी पवार साहेब यांचा विरोध केला. मात्र त्याच खा.श्री.पवार साहेबांमुळे आपल्या मंत्रीपद मिळाल्याची बाब ही अतिशय आश्चर्यकारक असल्याचे नमूद करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांनी कार्यक्रमात साहेबांचे तोंड भरून कौतुक केले.
आपले वडील आणि आदरणीय खा.श्री.पवार साहेब यांचे ऋणानुबंध होते. यामुळेच साहेब आज चांदसर येथे माझे वडील स्व.मुरलीधर अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलेत. त्याकरिता मी साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असे म्हणत श्री.संजय पवार यांच्या भावना अक्षरश: अनावर झाल्या. ओथंबलेल्या शब्दांनी श्री.संजय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.