राजमुद्रा वृत्तसेवा | करोनाच्या पहिल्या लाटेमुळे जनता गोंधळात असतानाच दुसऱ्या लाटेनं धडक दिली. करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. करोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील जागतिक विक्रमांची दुर्दैवी नोंद भारतात झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील दररोजची आकडेवारी जाहीर करण्यात येते. गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. २४ तासांत देशात एक लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन लाख ७६ हजार ३०९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत.
करोना रुग्णवाढीबरोबरच देशातील मृतांची वाढत्या संख्येनं काळजी वाढवली होती. देशात दिवसाला साडेचार हजार मृत्यू नोंदवले गेले. काही आठवडे देशात दिवसाला साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली होती. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन ४६० रुग्णांचा मृत्यू झाल्यांची नोंद झाली आहे. मात्र, मृत्यूंचा हा आकडा अजूनही चिंताजनकच असल्याचे दिसत आहे.