राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका
एकत्र येऊन महाराष्ट्रासमोरची आव्हाने परतवून लावूत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
मुंबई दि. 30: कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस शुभेच्छा दिल्या आहेत.
आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.
आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे.दोन वर्ष तर देशावरच कोरोना विषाणूचे संकट होते, पण याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग – गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन, तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. आरोग्य असेल किंवा सुशासन, पर्यावरण असेल किंवा नागरी विकास, महाराष्ट्राने उचललेल्या ठोस पावलांचे देश तसेच जागतिक पातळीवर पण कौतुक झाले. संकटातच खरी परीक्षा होते असे म्हणतात, त्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती किंवा विषाणूच्या आक्रमणात प्रशासनानेअगदी तळागाळापासून अतिशय धीराने आणि हिमतीने काम केले, त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडा उचलून सर्वांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न फिके पडल्याचे दिसते.
महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणाऱ्या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत. या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली. या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे.
आज दुर्देवाने स्वार्थ आणि महत्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपवून सामाजिक क्रांतीच्या या तमाम महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याची कामगिरी सुरू आहे. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारा म्हणून ओळखला जातो. एखाद्या राज्याची प्रगती म्हणजे काही केवळ किती गुंतवणूक तिथे आली आणि किती रस्ते झाले असे नाही. महाराष्ट्राने पर्यावरणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयवार जगाचेही लक्ष वेधले आहे. आरोग्याची पुढील काळातली आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे नियोजन केले आहे. खेडी, शहरे स्वच्छ असावीत, सर्वांना व्यवस्थित नळाने पाणी मिळावे, सर्वसामान्यांना घरे मिळावीत, शहरांचे आराखडे हे पुढील काही वर्षांच्या विकासाचा अदमास घेऊन तयार करावेत, विकेल तेच पिकेल असे ठरवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, सौर ऊर्जेचा वापर, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक या गोष्टींवर आम्ही केवळ भरच दिलेला नाही तर अंमलबजावणी सुरू केली आहे.
संघराज्य व्यवस्थेचा आम्ही सन्मानच करतो. विकासासाठी उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छा आमच्यात आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे आणि पार पाडतही आहोत.
मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील माझे तमाम बंधू आणि भगिनी हे ज्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो त्या परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कलुषित होऊ देणारे सगळे प्रयत्न हाणून पाडतील.
माझे सर्वांना,अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ यात.
000