जळगाव राजमुद्रा दर्पण | दिवसेंदिवस जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. दोन दिवसापूर्वीच मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार झाल्याची बातमी ताजी असतांनाच भडगाव तालुक्यात चार चाकीच्या अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव कार झाडावर आदळली, त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना पळासखेडाजवळ घडली आहे.पळासखेडा (ता.भडगाव) येथून चारचाकीने (क्रमांक- एम.एच.१९, सी.एफ. १८०३) किसन राठोड, पवन राठोड व जितेंद्र पवार हे तिघेही तरवाडे गावाकडे जात हाेते. कार भरधाव वेगात असताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळले. यात किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा,), पवन इंदल राठोड (वय २६, रा. गाळण ह. मु. टिटवाळा ता. कल्याण) आणि जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) हे तिघे जबर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना भडगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पाचोऱ्यामधील डॉक्टरांच्या वाहनावर चालक असलेला किसन हा पळासखेडाजवळ लग्नाला वाहन घेऊन आला होता. त्याच वाहनात सजवून नवदेव-नवरीला घरी घेऊन जाणार होता. मात्र, बिदाईला उशीर असल्याने तेवढ्या वेळेत नातेवाइकांना भेटण्यासाठी तो निघाला.