भारत राजमुद्रा दर्पण |अंदमान, निकोबारसह विवीध ठिकाणी मान्सूनची शक्यता… अंदमान, निकोबार बेटांसह अनेक ठिकाणी आज पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात केरळ आणि लक्षद्वीपमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज आला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात विषववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपवणारे बळकट दमदार पावसाळी वारे तसेच ताशी 45 किमी झटक्याखाली पुढील 5 दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व मोसमी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरवातीला दोन ते चार दिवसांच्या फरकाने येणार असल्याचेही खुळे यांनी यावेळी सांगितले. या सर्व शक्यता जरी असल्या तरी प्रत्यक्षात मान्सूनचा पाऊस तळ कोकण व घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात येईपर्यंत जूनच्या दुसऱ्या सप्ताहाला सुरुवात होते.