भारत राजमुद्रा दर्पण | DCGI कडून COVAXIN ला मान्यता देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे मुलांच्या लसीकरणाशी संबंधित बातमी समोर आली आहे. DCGI कडून कोवॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याचं समजत आहे. आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते. आता DCGI ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सीन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु आता लहान मुले देखील कोरोनाचा नवीन प्रकार XE च्या कचाट्यात सापडत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करणार असल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये हे लसीकरण देशात कधी आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाईल.
देशात सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाली आहे. दररोज देशात एक हजारांहून कमी रुग्णसंख्या नोंदवली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध संपले आहेत. तरीही फेस मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या XE या नव्या प्रकरणे चिंता वाढवली आहे. दरम्यान, लहान मुलांच्या एका मोठ्या वर्गाचे अद्याप लसीकरण झाले नसून, त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. “लहान मुलांमधील लक्षणे साधारणपणे सौम्य असतात आणि त्यात ताप, नाक वाहणे, घसा दुखणे, अंगदुखी आणि कोरडा खोकला यांसारख्या श्वसनमार्गाच्या लक्षणांचा समावेश होतो,” असे डॉ. अवी कुमार, वरिष्ठ सल्लागार, पल्मोनोलॉजी,यांनी सांगितले आहे.