जळगाव राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मागील काही दिवसांपासून आक्षेप करणाऱ्या पोस्ट होत आहेत. यात काल जळगाव जिल्ह्यातील दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकीत प्रल्हाद पाटील व हरीष कोळी (दोघांचे पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) या दोघा संशयितांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध केला होता. हा प्रकार लक्षात येताच लाडवंजारी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयितांच्या समाजमाध्यमावरील खात्याची तांत्रिक माहिती काढली आहे. लवकरच यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री केतकी चितळे, अडॅ. नितीन भावे यांनी देखील समाजमाध्यमातून पोस्ट करुन खासदार शरद पवार यांची बदनामी केली आहे, वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. त्यामुळे तिचे सोशल मीडियावरचे सर्व अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक करून पोलिसांनी कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात ती अशाप्रकारचे कृत्य पुन्हा करणार नाही. तिचे मानसिक संतुलन तपासून घ्या, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांना दिले आहे.