जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्हा दूध फेडरेशन व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागलेल्या धनराज सुरेश सोनार या कर्मचार्याच्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाने एक लाख रूपयांचा मदतनिधी देण्यास पुढाकार घेतला आहे. तर, दुध संघ व सरकारमधील तिन्ही पक्षांचे नेते व पदाधिकार्यांनी याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने भाजपने यावरून टीका केली आहे.
जिल्हा दूध संघात कंत्राटी कामगार असलेल्या धनराज सुरेश सोनार या कर्मचार्याला त्याचा ड्युडी टाईम संपला आल्यावरही त्याला वाहनावर पाठविण्यात आले. याच वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत त्याचा मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ मृत्यू झाला. या प्रकरणी दूध संघाकडून मदतीच्या अपेक्षेने त्यांचे कुटुंब हे पार्थिवाला घेऊन दूध संघात गेले असतांना पोलिसांनी त्यांच्यावर भीषण लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
कालच माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनराज सुरेश सोनार यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली. या प्रकरणात जिल्हा दूध संघाने तात्काळ मदत जाहीर करावी, त्यांच्या पत्नीला सेवेत सामावून घ्यावे अशा मागण्या कुटुंबाने केल्या. आमदार गिरीश महाजन यांनी या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच मयत धनराज सोनार यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणारे कार्यकारी संचालक लिमये यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान, याप्रसंगी आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते धनराज सोनार यांच्या कुटुंबियांना एक लाख रूपयांची मदत देण्यात आली. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिताताई वाघ, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका उज्जवला बेंडाळे धिरज सोनलने मुकुंद सोनवणे ,आबा कापसे, गणेश माळी, दिपमाला काळे सुचिता हाडा, अतुल हाडा,विजय वानखेडे, महेश चौधरी, प्रकाश पंडित,विशाल त्रिपाठी, जयेश भावसार, सचिन पानपाटील, चेतन तिवारी, भगत बालाणी आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एकीकडे भारतीय जनता पक्षाने मयत धनराज सोनार यांच्या कुटुंबाला भरीव मदत केली असतांना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी या कुटुंबाकडे फिरकूनही पाहिले नसल्याची बाब धक्कादायक आहे.