राजमुद्रा वृत्तसेवा | २०१९ मध्ये चिनच्या वुहान येथून संसर्ग झालेला कोरोना विषाणू जगभरात पसरला असून लाखोंच्या बळीला कारणीभूत ठरला आहे. हा जिवघेणा विषाणू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित? याचा शोध घेण्यासाठी जगभरातील संशोधक मोठे कष्ट घेत असून बरकाव्याने अभ्यास करून संशोधन करत आहेत. चीनने हा विषाणू नैसर्गिक असल्याचं सांगितलं असलं तरी नुकत्याच हाती आलेल्या एका रिसर्चनुसार हा चीनमध्ये तयार करण्यात आलेला विषाणू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केल्याचा दावा नुकत्याच एका अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. ‘सायन्स जर्नल क्वार्टरली रिव्ह्य़ू बायोफिजिक्स डिस्कव्हरी’ या नियतकालिकात हा २२ पानांचा रिसर्च पेपर लवकरच प्रकाशित केला जाणार असून चीनचे बिंग फोडणार आहे.
कोरोना मानवनिर्मीत असल्याचा दावा ब्रिटिश प्राध्यापक अँगस डालगेश व नॉर्वेचे वैज्ञानिक बर्गक सोरेनसेन यांनी आपल्या रिसर्चमध्ये केला आहे. जगभरात थैमान घालत असलेला कोरोना विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केला आहे. वुहानच्या स्थानिक प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यामध्ये सहभागी होते. त्यानंतर त्यांनी कोरोना वटवाघळातूनच आला असे दाखवण्यासाठी त्याचे रूप त्या पद्धतीने बदलले व तो नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने रचना केली, असा गौप्यस्फोट रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे.
रिसर्चमध्ये म्हटले आहे की, सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणूचा कोणताही नैसर्गिक पूर्वज नाही. हा विषाणू चीनच्या वैज्ञानिकांनी ‘गेन फंक्शन’ या प्रकल्पात कृत्रिमरीत्या तयार केला. वुहान प्रयोगशाळेत चीन संशोधकांनी पहिल्यांदा वटवाघळातील विषाणूंची रचना अभ्यासण्याचा प्रयत्न केला. चीनच्या गुहांमध्ये सापडलेल्या वटवाघळांतील विषाणू घेऊन त्याचे रूप काट्याप्रमाणे केले. त्याचे रूपांतर नंतर घातक कोविड-19 विषाणूत झाले. नंतर त्यांनी तो नैसर्गिक विषाणू असल्याचा बनाव केला. विषाणूमध्ये ज्या खुणा आढळतात त्यावरून मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होते.
‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या संस्थेतील वैज्ञानिकांनीच कोरोनाचा कृत्रिम विषाणू तयार केला, असा आरोप ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनीही केला आहे. आता हा २२ पानी रिसर्च पेपर जगजाहीर झाल्यावर चीनची याबाबतची पुढची काय भूक राहील किंवा या विरोधात चीन अजून कोणते नवे बनाव करेल यावर सगळ्या जगाचे लक्ष लागून राहणार आहे. आधीच जगभरातून चीनवर टीका होत असताना या अहवालातून चीनची वास्तविकता अधिक स्पष्ट होणार आहे.