मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा| पिंपरी-चिंचवड येते भाजपा आमदार महेश लांडगे यांनी करोना नियमांचं उल्लंघन करत जल्लोष केल्याचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असून या विरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. येत्या ६ जून रोजी त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा असून त्यापूर्वी काल (ता ३०) झालेल्या मांडव सोहळ्यात महेश लांडगे यांनी भंडारा उधळून डान्स केल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी बरीच गर्दी दिसून आली असून यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावला नव्हता. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींनी गर्दी करत जल्लोष केला. तसेच, वाजंत्री, बैल जोड्यांच देखील आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी आमदारा महेश लांडगे यांना खांद्यावर घेऊन वाजंत्रीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी एकच ठेका धरला होता. आजूबाजूला भंडाऱ्याची उधळण होत होती. काही सेकंदाच्या डान्स मोबाईलमध्ये टिपण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी करोना नियमांचे उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टसिंगचा देखील फज्जा उडाला होता. त्यामुळे आता पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यासंबंधी काय कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसमान्यांमधून उपस्थित होत आहे. कोरोनाचे नियम राजकीय मंडळींसाठी वेगळे आहेत की काय असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.