मुंबई राजमुद्रा दर्पण | दक्षिणेच्या बाजूने मान्सून प्रगती करत येत आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असून मान्सूनची घोडदौड प्रगतीने सुरू आहे. अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर मान्सून आला असून, राज्यात मान्सून 5 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
एकीकडे मान्सूनची घोडदौड वेगाने सुरू असताना राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला असून, त्यामुळे काही भागांत फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आहे. महाराष्ट्रातही या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो आहे.
आष्टी तालुक्यातल्या काही गावांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याबरोबरच उन्हाळी कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात बीडच्या आष्टीमध्ये शेतकरी घेत असतात. काढणीसाठी तयार असलेले कांद्याच्या पिकाचे अवकाळी पाऊसामुळे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे कांद्याचे पीक शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. नसलेल्या पिकातून काय उत्पन्न मिळणार असे शेतकरी म्हणत आहे.