जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा| शहरातील सचिन कापडे या होमगार्ड तरुणाने तयार केलेल्या ‘कर्तव्य’ या शॉर्टफिल्मचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी कौतुक केले आहे. या लघु चित्रपटात सामाजिक स्तरावर पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या होमगार्ड या दुर्लक्षित झालेल्या घटकाचे चित्रण केले असून, त्यांच्या कोरोना काळातल्या व्यथा मांडलेल्या आहेत. सचिन कापडे यांनी या शॉर्टफिल्मची निर्मिती केली असून आज माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन करून यांना हा लघुचित्रपट दाखवण्यात आला. कापडे यांच्या कामाचे कौतुक करत होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीची अपेक्षा न करता होमगार्ड आपले कर्तव्य चोखपणे बजावत असून, कोरोनाच्या काळातही मोठ्या प्रमाणावर कर्तव्यावर आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता होमगार्ड कर्मचाऱ्यांचे वेतन अडकून पडले असतांनाही ते आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठतेला समर्पित ‘कर्तव्य’ ही शॉर्टफिल्म तयार करण्यात आलेली आहे.
शॉर्टफिल्मचे निर्मितीकार सचिन कापडे यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले “मी स्वतः एक होमगार्ड आहे; त्यामुळे होमगार्ड वर्गाची परिस्थिती मी जाणून आहे. कोरोनाच्या काळात आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता काम करत आहोत. गेले कित्येक महिन्यांपासून आमचे पगार रखडले असले तरी एक सामाजिक बांधिलकी या नात्याने प्रत्येक होमगार्ड आपले काम चोखपणे करत आहे. काही होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये अक्षरशः दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असताना होमगार्ड आज आपल्या कर्तव्या प्रति जागरूक असून आपले काम करत आहे. ही शॉर्टफिल्म त्या सर्व होमगार्डला समर्पित केली आहे. आज माननीय गिरीश महाजन यांनीही या शॉर्टफिल्म चे कौतुक केले असून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
शोध फिल्म प्रोडक्शन व साजन फोटो स्टुडिओ यांची ही प्रस्तुती असून, हर्षदा वाघ, सचिन कापडे, सचिन वाघ, प्रणेश ठाकूर, महेश कोळी, रवी महाजन हे मुख्य भूमिकेत आहेत. सह कलाकार म्हणून हर्षा तायडे, कांचन हांबेकर यांनी काम केले. लेखक/दिग्दर्शक- सचिन आनंदा कापडे, छायाचित्र- सागर परदेशी, संकलन- व्हिजनरी क्रिएटिव्ह, कला दिग्दर्शक- आकाश परदेशी, सहाय्यक दिग्दर्शन- अविनाश निरखे, कला सहाय्यक- ऋतिक परदेशी, दीक्षा निरखे, रंगभूषा- उज्वला शिंपी, केशभूषा- मोहिनी निरखे, पोस्टर डिझाईन- मयुरी अहिरे, हर्षदा म्हस्के, व्ही एफ एक्स निर्माता- व्हिजनरी क्रिएटिव्ह, निर्माता- महाराष्ट्र होमगार्ड, शोध फिल्म प्रोडक्शन, सचिन कापडे, सागर परदेशी, संगीत दिपक महाजन, ध्वनी मिक्सिंग- व्हिजनरी क्रिएटिव्ह, डब्बिंग- अमोल ठाकूर, कविता- राहुल सोनवणे, प्रोडक्शन टीम- स्वप्नील गायकवाड, दिकाप महाजन, अमोल ठाकूर, अमोल सुर्यवंशी, रवी महाजन, अक्षय बाविस्कर, महेश कोळी, निलेश कोळी, गौतम निकम, प्रदीप भोई यांनी सहकार्य केले आहे.
वा कापडे साहेब तुम्ही केलेला प्रयत्न अशिषय कौतुकास्पद आहे ….अशीच तर्क्की करा आमचे शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहे .
गौरव लवांगले
(राष्ट्रवादी जिल्हा व शहर अध्यक्ष सांस्कृतिक विभाग)