जळगाव राजमुद्रा दर्पण | पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर मधील आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मध्ये सुरू असलेल्या राजकीय दावे प्रति दाव्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे आमदार आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना डिवचत रहावे अशी अपेक्षा आहे. कारण, खडसे जोपर्यंत चंद्रकांत पाटील यांना डिवचत राहतील, तोपर्यंत चंद्रकांत पाटील हे आपल्या मतदारसंघात चांगले काम करतील असाही टोला गुलाबरावांनी लगावला
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी कितीही मिठाचे खडे टाकले तरी शरद पवार, उध्दव ठाकरे त्याची साखर करून टाकतील, अश्या शब्दात शिवसेना उपनेते स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे.
शिवसंपर्क अभियानाच्या नियोजनासाठी आयोजीत बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुक्ताईनगर येथिल शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर खडसेंनी केलेल्या आरोपाबाबत आपली भूमिका मांडली.
मुक्ताईनगर मध्ये आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मध्ये विकास कामांवर राजकीय कलगीतुरा रंगला आहे. यामध्ये एकमेकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फिर्याद काढल्या जात आहे. यामुळे मुक्ताईनगर सह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोणत्या न कोणत्या घटनेवरून खडसे – पाटील हे दोन गट एकमेकांना भिडताना दिसून येत आहे. यातच महाविकास आघाडी मध्ये जळगाव जिल्ह्यात कलह रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
राणे बाळासाहेबांचे झाले नाहीत
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना विसरली असल्याची टिका नारायण राणे यांनी केली होती. याबाबत उत्तर देताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, राणे हे स्वत: बाळासाहेबांना सोडून गेले. जे बाळासाहेबांचे झाले नाही, त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही श्रेय घेण्याची गरज नाही. विधानसभेत सर्वांनी बहूमताने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण मिळू देत नसल्याची भाजपाची टीका बिनबुडाची असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.