(राजमुद्रा वृत्तसेवा) फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला डोमिनिका येथून भारतात परत आणण्यासाठी पाठवलेले विमान शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले आहे. मेहुल चोक्सी प्रकरणी डोमिनिका उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, ही सुनावणी सध्या तहकूब करण्यात आली असल्यामुळे सीबीआय टीम रिकाम्या हाती माघारी परतली आहे. भारत चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असून याची कमांड सीबीआय अधिकारी शारदा राऊत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राऊत या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या चौकशीचे नेतृत्व करीत आहेत.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (सीबीआय) उपमहानिरीक्षक शारदा राऊत यांचे पथक पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी फरार मेहुल चोकसीला परत आणण्यासाठी सात दिवस डोमिनिकामध्ये तळ ठोकून होते. चोक्सीच्या वकिलांनी डोमिनिका उच्च न्यायालयात हाबियास कॉर्पस याचिका दाखल केली होती, त्यावरील सुनावणी गुरुवारी पुढे ढकलण्यात आली आहे. अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेल्या त्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहावे अशी विनंती करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.
स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी सुमारे एक महिन्यानंतर होऊ शकते आणि यावेळी चोक्सी डॉमिनिकामध्ये राहील. अँटिगा न्यूजरूमच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीश बर्नी स्टीफेन्सन चोकसी प्रकरणातील सुनावणीची पुढील तारीख दोन्ही बाजूंची चर्चा केल्यानंतर देण्याची शक्यता आहे.
डोमिनिका कोर्टात युक्तिवादसुनावणीत भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी डोमिनिका प्रशासनाबरोबर अनेक फेऱ्यांत चर्चा केल्या आहेत. मेहुल चोक्सीच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती सोबतच टीमने डोमिनिका कोर्टात ईडीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. या कागदपत्रांद्वारे सांगण्यात आले की चोक्सी हा भारताचा नागरिक आहे. भारतीय टीम कोर्टाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की, डोमिनिकाच्या ताब्यात असलेली व्यक्ती जानेवारी 2018 पासून भारताला हवी आहे आणि इंटरपोलने दिलेल्या रेड नोटीसच्या आधारे त्याला त्वरित भारतात सुपूर्द केले जावे, अशी मागणी केलेली आहे. मात्र, सुनावणी तहकूब झाल्याने आता वाट पाहावी लागणार आहे.