मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने आज 31 मे रोजी आरक्षण सोडत काढली. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक 206 हा सर्वसाधारण झाला असून, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांचा वॉर्ड क्रमांक 130 हा महिलांसाठी राखीव झाला आहे.ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत निघत असून यात मात्तबर नगरसेवकांचे वॉर्ड राखीव झाले आहेत. तर काही राखीव वॉर्ड खुले झाले आहेत. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही 96 हा प्रभाग महिलांकरता राखीव झाला आहे. तर, भाजप जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सुषम सावंत यांचा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे.
आजच्या सोडतीनुसार बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आणि भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. तर, शिवसेना नगरसेवक आरोग्य समिती माजी अध्यक्ष अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.