जळगाव (प्रतिनिधी) : सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना सामाजिक प्रश्नांची दाहकता दिसून येते. याच अनुभवावर आधारित देहदान, जोडीदाराची विवेकी निवड, जातपंचायती, चमत्कारद्वारे होणारी फसवणूक यांविषयी सविस्तर विवेचन असलेली आज प्रकाशित झालेली पाच पुस्तके समाजाला मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक औरंगाबाद येथे एमजीएम विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहामध्ये सुरू आहे. यावेळी समितीच्या चार कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन शनिवार दिनांक ४ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आमदार विक्रम काळे बोलत होते. प्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक अभ्यासक प्रा.डॉ.जयदेव डोळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रदीप विखे, औरंगाबाद अंनिसचे अध्यक्ष डॉ. रश्मी बोरीकर, अंनिसचे प्रकाशन विभागाचे कार्यवाह तथा लेखक मच्छिंद्रनाथ मुंडे, इतर लेखक प्रा.सुशील मेश्राम, कृष्णा चांदगुडे, आरती नाईक मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रस्तावनेमधून मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देत पुस्तकांच्या स्वरूपाविषयी सांगितले. यानंतर पुस्तकांच्या लेखकांनी त्यांच्या पुस्तक लेखनाविषयीचे अनुभव सांगितले. यानंतर सामाजिक विषयांवर आधारित पाच पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांनी केले.
आ. विक्रम काळे म्हणाले की, वडिलांपासून परिवर्तनवादी व समाजवादी विचारसरणी पुढे घेऊन जात आहे. देहदान – अवयवदानाची चळवळ पुढे गेली पाहिजे. तसेच लग्नाळू मुला-मुलींनी जोडीदाराची निवड विवेकी होण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन करून घेणे महत्त्वाचे आहे. भोंदूबुवांकडून होणारे चमत्कारांचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. अतिशय मोजक्या शब्दांमध्ये सर्व लेखकांनी महत्त्वाची मांडणी केली आहे, असेही ते म्हणाले.
प्रा.डॉ.जयदेव डोळे म्हणाले की, जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह होणे महत्त्वाचे आहे. चांगले विचार कृतीत आले पाहिजे. आजच्या तरुणांच्या डोक्यात चुकीची माहिती भरण्याचे काम सामाजिक माध्यमांद्वारे केले जात आहे. यामुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे. तरुणांना विधायक व अचूक माहिती दिली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
परिवर्तनवादी चळवळीमध्ये स्वतःला विवेकी व चिकित्सक म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यवहारात मात्र शून्यात आणली आहे. ती कृतिशील झाली पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये आता विचारांची मांडणी खुप झाली मात्र त्याबाबत कृती आता घडून आली पाहिजे, असे अध्यक्षस्थानावरून अविनाश पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रा. संजय बनसोडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पठाडे, प्रधान सचिव दीपक खंडागळे, शाखा कार्याध्यक्ष सुनील चोतमोल, मोहन भोमे, दीक्षा काळे, अतुल बडवे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या पुस्तकांचे झाले प्रकाशन
कार्यक्रमात कृष्णा चांदगुडे लिखित “जातपंचायतीला मूठमाती”, आरती नाईक संपादित “जोडीदाराची विवेकी निवड”, मच्छिन्द्रनाथ मुंडे लिखित “चमत्कारांचा भुलभुलैय्या”, प्रा. सुशील मेश्राम लिखित “अवयवदान देहदान – भ्रम आणि निरभ्रम” व “देहदान-अवयवदान – मृत्यूनंतरची सुंदर भेट” या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.