जळगाव राजमुद्रा दर्पण |- राज्यसभेची तिसरी जागा जिंकून भाजपाने महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का दिला. यामुळे भाजपाच्या अपेक्षा विधानपरिषदेत उंचावल्या आहेत. पुन्हा त्यांनी पाचवी जागा जिंकण्याची फिल्डिंग लावली आहे. ही पाचवी जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून खेचण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. त्यांना राज्यसभेसाठी मतदानाचा हक्क न्यायालयाने नाकारला होता. आताही तसे झाले तर राष्ट्रवादीचे दोन आमदार कमी होतील. याशिवाय काही नाराज म्हणजे ज्यांना खडसे नको आहेत, अशांना हेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाचे काम स्वतः देवेंद्र फडणवीस तर फोडाफोडीचे काम भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी ही जबाबदारी घेतली आहे. खडसेंना जेव्हा तिकीट जाहीर झाले तेव्हा ‘तोडपाणी’ या शब्दाची आठवण त्यांनीच राष्ट्रवादी नेत्यांना आधी करून दिली होती. याचा अर्थ ते किती आघाडीवर आहेत हे लक्षात येते.
भाजपा शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतील किवा शिवसेनेसोबत गेलेले अपक्ष, छोटे पक्ष यांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एकंदरीत एकनाथ खडसे आणि शिवसेनेला धक्का देण्याची फिल्डिंग सर्व नीती वापरुन करण्यासाठी भाजपातील काही नेते सज्ज झाले आहेत.