(राजमुद्रा वृत्तसेवा) देशात भयावह परिस्थिती निर्माण करणारी करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. फेब्रुवारीमध्ये देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच झाला. दुसऱ्या लाटेत जगात दैनंदिन उच्चांकी रुग्णसंख्या भारतात नोंदवली गेली. करोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची उपचारासाठी प्रचंड फरफट झाली. मात्र, आता दुसरी लाटेची तीव्रता कमी होत असून, गेल्या २४ तासांतील करोनाची आकडेवारी दिलासा देणारी आहे.
देशातील करोना परिस्थितीबद्दलची दैनंदिन आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येते. देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासादायक आहे. देशात काल दिवसभरात (८ जून) ९२ हजार ५९६ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत एक लाख ६२ हजार ६६४ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या २४ तासांत देशात दोन हजार २१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातही दिवसभरात १६ हजार ५७७ रूग्ण करोनातून बरे झाले. तर, १० हजार ८९१ नवीन करोनाबाधित आढळून आले. २९५ करोनाबाधितांच्या मृ्त्यूची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.