(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची कामे जलद गतीने करा व वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिले आहेत.
उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेचा (एचव्हीडीएस) आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ राऊत यांनी एचव्हीडीएस योजना राबवितांना गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी कामाचे वेळोवेळी योग्य निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून प्रलंबित एचव्हीडीएसच्या कामाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
विशेष घटक योजने अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या अर्जदारांना वीज जोडण्या देण्यासाठी निधी उपलब्ध असून या प्रवर्गातील अर्जदारांना वीज जोडण्या देण्यासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती कार्यालयाच्या माहिती पत्रकावर ठळकपणे नमूद करून याला व्यापक प्रसिद्दी देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. कोरोनाच्या काळात ही योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्यात. त्या अडचणी दूर करीत यापुढे ही योजना जलदगतीने राबविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
नागपूर प्रादेशिक विभागात एचव्हीडीएसचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात ६४ टक्के, कोकण व पुणे प्रादेशिक विभागात प्रत्येकी ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे या बैठकीत एका सादरीकरणात सांगण्यात आले. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.