विधान परिषदेच्या मतमोजणी दरम्यात काँग्रेस ने भाजप च्या 2 मतांवर आक्षेप घेतला त्यामुळे मतमोजणी ला उशीर झाला, या दरम्यात राज्य निवडणूक आयोगाने तक्रार फेटाळल्यानंतर काँग्रेसने या तक्रारीला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपच्या दोन आमदारांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान केल्याबद्दल काँग्रेसने आक्षेप घेतला. हे गुप्त मतदान पद्धतीच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा काँग्रेसचा युक्तिवाद आहे, मात्र भाजपच्या वतीने भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना विश्रांती दिली आहे. डॉक्टरांनी यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. तरीही या दोन्ही आमदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याची इच्छा व्यक्त करत रुग्णवाहिकेने विधानभवन गाठले. त्यांना मतदानात मदत करण्यासाठी पक्षाने विधिमंडळाच्या मुख्य सचिवांची आधीच परवानगी घेतली होती. त्यामुळे या मतावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही.