(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आम्हाला पाच वर्षे गुलामाची वागणूक मिळाली. या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार केला आहे. भाजपने गुलामाची वागणूक दिली म्हणताय मग गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत?; असा संतप्त सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यानंतर भाजपशी विश्वासघात केला. दगा दिला. आता स्वत:च्या या कृतीचे समर्थन करण्यासाठी असले उद्योग सुरू आहेत, असं सांगतानाच भाजपने गुलामासारखी वागणूक दिली म्हणता, मग सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेची लोणी खाणे बरे वाटते का?, असा सवाल भातखळकर यांनी केला. बाळासाहेब ठाकरे गेले. तेव्हा सोनिया गांधींनी त्यांच्या श्रद्धांजलीचं साधं ट्विटही केलं नाही. काँग्रेससोबत सत्तेत राहणं म्हणजे गुलामगिरीपेक्षाही वाईट आहे. हे शिवसेनेने कायम लक्षात ठेवावं, असंही भातखळकर म्हणाले.
राऊतांच्या या विधानाचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही समाचार घेतला आहे. खरं तर आपण केलेल्या बेईमानीला झाकण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातोय. लोकशाहीत कुणी राजा नाही, कुणी गुलाम नाही. गुलामाचा स्वाभिमान जागण्यासाठी ५ वर्षे जावी लागली? गुलामासारखी वागणूक दिली तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार खुर्चीसाठी गुलामी करतील? हे ऐकलं की अंगावर काटा येतो. या शब्दाचा उपयोग केला जातो हे आश्चर्यजनक आहे. मग ५ वर्षे खिशात असलेले राजीनामे, त्या खिशाला काय चैन होती, चैनला काय मोठं कुलूप होतं? जर तुम्हाला गुलामगिरीची वागणूक दिली गेली होती, तर एका सेकंदात ते राजीनामे तोंडावर फेकून मारायचे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार इतका कमजोर असू शकतो की, २४ ऑक्टोबर २०१९ च्या निकालाची वाट पाहावी लागली गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी? आणि २४ ऑक्टोबर २०१९ ला जेव्हा लक्षात आलं की भाजप १०५ जागांच्या वर जात नाही तेव्हा यांना आठवण झाली की, ५ वर्षे आम्ही गुलामगिरीत होतो. आता आमच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आहे आणि आता आम्ही राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात जाऊन बसणार, ही त्याची व्याख्या आहे का?, असा घणाघाती हल्ला मुनगंटीवार यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आज जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेना मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला होता.