(चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा) ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. आज स्वतःचे घर मिळत असल्याचा आनंद या बेघर असलेल्या समाजबांधवांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. असे प्रतिपादन खा. उमेश पाटील यांनी केले.
बऱ्याचदा घरकुल मंजुरीची प्रक्रिया लाभार्थ्यांना माहीत नसल्याने, ऑनलाइन प्रक्रिये बाबत माहिती नसल्याने अनेक संधीसाधू लोक लाभार्थ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे गोरगरीब जनतेला शासनाच्या या लाभापासून वंचित राहावे लागते, असे खासदार उमेश पाटील यांनी सांगितले. चाळीसगाव पंचायत समिती येथे महाविकास अभियान ग्रामीण यंत्रणा, ग्रामीण विकास राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संजय पाटील, जि प सदस्य भाऊसाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य कारभारी पवार, जिभाऊ पाटील, अविनाश करपे, पाटणाचे सरपंच नितीन चौधरी यांच्यासह रोहिदास सोनवणे, सुरेश गायकवाड, अनिल गायकवाड, धरमसिंग पवार आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार उमेश पाटील यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हक्काच्या घराच्या चावीची प्रतिकृती देण्यात आली. सरकारच्या या ऑनलाइन कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. योजनेची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांनी दिली.