(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील विविध विकासकामांसाठी २२ कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंजूर केला होता. याअंतर्गत महापौर जयश्री महाजन यांच्या पाठपुराव्याने २१ कोटी ९८ लाख ९४ हजार २७९ रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी काढले आहेत.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी २२कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. नगरोत्थान योजनेंतर्गत प्राप्त कामांच्या प्रस्तावाला मंजुरीचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे. जळगाव मनपाकडून रस्ते, गटारी, उद्यान, व्यायामशाळा अश्या विविध कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
शहरातील परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महापौरांच्या पाठपुराव्याने प्रस्तवाला मंजुरी मिळाली असून मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया लवकरच सुरू करून मार्च अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यात येतील असे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.