मुंबई राजमुद्रा | वेदांत प्रकल्पावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गेला कसा ? याबाबत चौकशी करण्याची मागणी राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना केली आहे. काही दिवसांपूर्वी वेदांत प्रकल्प राज्यभरात पेटलेले असताना आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी प्रकरणाला फोडणी दिल्याने शिंदे-फडणवीसांची सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच विरोधी पक्षाकडून वेदांत प्रकल्पावरून चांगलेच वातावरण तापवण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आघाडीवर होते मात्र यात मनसेने उडी घेतली आहे.
वेदांत प्रकल्प हा गुजरातला कसा गेला याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात उद्योग यायला हवेत यामुळे तरुणांना रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भ दौऱ्यावर असून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी घेत आहे तसेच सद्यस्थितीत पक्षाचे ध्येय धोरण आणि राजकीय परिस्थितीबाबत आढावा देखील घेत आहे.
आगामी निवडणुकांमध्ये भाजपासोबत मनसे युती करणार याबाबत विविध राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. यापूर्वी भाजप नेत्यांची गणेशोत्सवामध्ये राज ठाकरेंच्या घरी लागलेले रिंघ त्याचा प्रत्यय आणणारा आहे. यामुळे भाजप मनसे युती होईल की नाही हा लांबणीवरचा विषय असला तरी राज ठाकरेंनी वेदांत प्रकल्पावरून केलेली कोंडी भाजपा मनसेचा दुरावा निर्माण करणारी आहे. कारण यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वेदांत प्रकल्पावरून अनेकवेळा ट्रोल व्हावे लागले आहे. असे असताना आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा वेदांत प्रकल्पावर भाष्य केले आहे.