राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानानंतर सध्या जरी कोरोनाचा जोर ओसरला असला तरी पुढच्या दीड दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असून तिला टाळता येणं अशक्य असल्याचा खळबळजनक खुलासा एम्स प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी केला आहे. देशामध्ये विविध ठिकाणी अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे सोबतच लसिकरणावरही भर दिला जात आहे. अशात तीसऱ्या लाटेचा धोका गुलेरिया यांनी व्यक्त केला.
लसीकरण हे मुख्य आव्हान आहे. नवी लाट तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, पण इतर गोष्टींवर अवलंबून असल्याने ही वेळमर्यादा कमीदेखील होऊ शकते. कोरोनासंबंधित नियमांसोबतच लक्ष ठेवणंही महत्वाचं आहे. गेल्यावेळी नवा विषाणू जो बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज असल्याचे रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.
डेल्टा प्लस विषाणू बाबत बोलतांना या विषाणूच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी नव्याने रूपरेषा आखण्याची गरज असून निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असतांना नागरिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचेही ते म्हणाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून नागरिकांनी अजूनही धडा घेतलेला नाही त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास तिसरी लाट अपरिहार्य असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.