धरणगाव : तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चोरी झालेल्या घरांमधून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्री खुर्द येथील जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील (वय ७३) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. लोटू पाटील हे दोन दिवसांपासून वैद्यकिय उपचारासाठी बाहेगावी गेले होते. घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधत ५० हजाराची रोकड आणि साडेपाच तोळे सोने चोरी केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच यांच्या घराच्या शेजारी असलेले संदिप किसन खंडू शिंदे (वय ३८) हे खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शिंदे यांचेकडेही चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि जिभाऊ पाटील, सहा.फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत पोहेका करीम सय्यद, कैलास पाटील, समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने चौकशी सुरु आहे. तसेच, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आल्याचे कळते. दरम्यान, चोरट्यांनी श्री. पाटील यांच्या घरातून ५० हजाराची रोकड आणि साडेपाच तोळे सोने लंपास केल्याचेही कळतेय.