जळगाव: शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा उच्छाद वाढला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी गेले आहेत. नेमकं हीच संधी हेरुन चोरचे बंद घरांना निशाणा बनवित आहे. असेच बंद घर फोडून चोरांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शहरातील सोनी नगरात उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत प्रदीप सुर्यवंशी (वय ३१) हे आपल्या पत्नी व दोन मुलांसोबत सावखेडा रोडवरील सोनी नगरात राहायला आहे. हेमंत सुर्यवंशी हे पत्नीसह सासरवाडी नादेंड येथे गेले होते. घराला कुलूप लावून नांदेड येथील काम आटोपून पुन्हा सोनी नगरात राहत्या घरी आले असता, कंम्पाऊंड गेटचे कुलूप तोडलेले दिसले. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याची जाणीव झाली.
लोखंडी कपाटातून दागिने लंपास
घरात जावून पाहिले असता, चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदींचे दागिने, लॅपटॉप आणि मोबाईल असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.