मुंबई : राज्यातील 7750 ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज (दि. 9) जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. सध्या गावागावांतून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडमोडींना वेग येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल हा दोन दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबरला समोर येईल. कारण 20 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलीय.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
– ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
– नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.
– नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.
– नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
– मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
– मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.