कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारमधील नवादा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू एरिया मोहल्ला येथे घडली. केदारलाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री उशिरा पत्नी आणि चार मुलांसह विष प्राशन केले. कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मृतांमध्ये घराचे प्रमुख केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी आणि तीन मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी आणि गुडिया कुमारी यांचा समावेश आहे, तर मुलगी साक्षीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या साक्षीला नवाडा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथेही गंभीर स्थिती पाहता साक्षीला आता पाटणा येथे हलविण्यात आले आहे.
धर्मिकस्थळी जावून केले विषप्राशन
केदारलाल गुप्ता हे शहरातील विजय बाजारमध्ये फळांचे दुकान चालवायचे, त्यांच्यावर खूप कर्ज होते. कर्ज वसुलीच्या तगादामुळे कंटाळून संपुर्ण परिवाराने शहरातील एका धर्मिकस्थळी जाऊन विष प्राशन केले. या घटनेत कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुटूंबावर 10 ते 12 लाख रुपयांचे कर्ज
विषबाधेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान कुटुंबप्रमुख केदारलाल गुप्ता यांची प्रकृती थोडी बरी होती. विष का घेतले असे विचारले असता? केदारलाल गुप्ता यांनी कुटुंबावर 10-12 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले, कुटुंबाने आनंदाने होकार देत विष प्राशन केले. यानंतर केदारलाल गुप्ता यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.
विष प्राशन करण्यापूर्वी मुलाने बनवला व्हिडिओ
केदारलाल गुप्ता यांचा मुलगा प्रिन्सनेही विष प्राशन करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, ‘काही लोकांकडून कर्ज घेतले आणि ते आम्हाला खूप त्रास देत होते, आम्ही पैसे परत करण्यासाठी थोडा वेळ मागितला, पण लोक ते ऐकायला तयार नव्हते आणि वारंवार धमक्या देत होते. त्यामुळे या छळाला कंटाळून सर्वांनी विष प्राशन केल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्याचवेळी साक्षीने सांगितले की, तिचे वडिल गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते, त्यांनी कर्ज का घेतले हे आम्हाला माहित नसल्याचे सांगितले.