मुंबई : मोबाईलवर टाईमपास म्हणून गेम खेळण्याची अनेकांना सवय असते. त्यातच मोबाईलवर खेळला जाणारा लुडो हा ऑनलाईन गेम अतिशय लोकप्रिय झाला आहे. परंतु हा गेम एका तरुणाला फारच महागात पडला. लुडो खेळताना तरुणाने 60 लाख रुपये गमावले आणि या पैशांची वसुली करणाऱ्यांनी बंदुकीच्या धाकावर तरुणाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणाला काही जणांनी लुडो खेळात हरवलं आणि त्याने 60 लाख रुपये गमावल्याचं सागितलं. क्लॉडिएस मुदालियार असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार त्याने मुंबईतील धारावी पोलिसात नोंदवली आहे.
काय आहे प्रकरण?
क्लॉडिएस मुदालियारच्या मुशारफ खान नावाच्या मित्राने त्याच्याकडून 5 हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत देण्यासाठी मुशारफने त्याला सांताक्रूझला बोलावलं होतं. इथे मुशारफचा मित्र वेलू मुरगन आणि इतर लोकांना क्लॉडिएसला भेटला. इथे या लोकांनी क्लॉडिएसला दारु पाजून लुडो खेळण्यास सांगितलं.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यानंतर तू या खेळात 60 लाख रुपये हरल्याचं या लोकांनी क्लॉडिएसला सांगितलं. त्यामुळे मुशारफ आणि त्याच्या मित्रांनी क्लॉडिएसला 60 लाख रुपये देण्यास सांगितलं. पण त्याने नकार दिल्यानंतर या लोकांनी क्लॉडिएसच्या अंगावर जेवढे सोन्या-चांदीचे दागिने होते ते बंदुकीच्या धाकावर लुटले. याबाबत क्लॉडिएस याने धारावी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल केला आहे.