जळगाव : कंपनीच्या कार्यालयात बळजबरीने घुसत महत्वाचे कागदपत्रे, सोन्याचे शिक्के आणि रोकड असा एकूण 1 लाख 14 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी रवी देशमुख, विनोद देशमुख यांच्यासह 11 जणांविरुद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनोज लिलाधर वाणी (वय 40, रा. 22 जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) यांनी रामानंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, त्यांचे शहरात रामदास कॉलनी येथे मनोकल्प ट्रेडींग अॅण्ड सर्व्हिसेस, मनोकल्प प्रतिष्ठान आहे. या ऑफीसमध्ये 31 ऑक्टोबर रोजी सुमारे 12 ते 4 वाजेच्या दरम्यान शिपाई प्रदीप बारी हे असताना जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, विनोद पंजाबराव देशमुख, जगदीश पुंडलिक पाटील, मिलींद नारायण सोनवणे, रितेश देवराम पाटील, कैलास पाटील, एक महिला व इतर 1 अनोळखी महिला व तीन ते चार अनोळखी इसम असे हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी आणि निळ्यारंगाची महिंद्रा स्कॉर्पीओने कंपनीच्या ऑफीसमध्ये आले. त्यांनी शिपाई प्रदीप बारी यांना धमकावून बळजबरीने कंपनीच्या ऑफीसमध्ये प्रवेश केला.
वाणी यांना जीवे मारण्याची धमकी
शिपाई प्रदीप बारी याने वाणी यांना मोबाईलवर फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर मनोज वाणी हे लागलीच कंपनीच्या ऑफीसला पोहचलो. त्यावेळी वरील इसम हे कंपनीचे मुळ रेकॉर्ड, मौल्यवान दस्तऐवज, संगणक, एचपी कंपनीचा लॅपटॉप, तसेच पूजेच्या सोन्याचे 3 ग्रॅमचे 3 शिक्के व 120 ग्रॅम एकुण वजनाचे चांदीचे 6 शिक्के व रोख रक्कम रु 12,500 असा सामान बळजबरीने घेऊन जात असतांना त्यांना दिसले. त्यावेळी त्यांना वाणी यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता जितेंद्र उर्फ रवी देशमुख व विनोद देशमुख अशांनी वाणी यांना पकडून शिवीगाळ करीत तु इथे। थांबला तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. तसेच वरील सामान बळजबरीने मालवाहू रिक्षामध्ये घेऊन गेले. याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.