जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | अलीकडेच महाराष्ट्र सरकारने राज्याच्या कृषी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यातील सुधारणा करण्यासाठी पाऊलं उचलले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कमिटी प्रमुख सदस्य प्रतिभा शिंदे यांनी भूमिका व अपेक्षा शरद पवार आणि इतर नेत्यांसमोर मांडल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे राहावे व केंद्रीय कायद्यांना विरोध करणारा स्पष्ट ठराव करावा असे आवाहन सर्व शेतकरी व आंदोलनातील प्रमुख नेत्यांच्या वतीने प्रतिभा यांनी केले. शिंदे यांनी तसे निवेदन देऊन शरद पवार यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.
महाराष्ट्र सरकारने नुकताच शेतकरी बांधवांना केंद्रस्थानी ठेऊन राज्याच्या कृषी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रतिभा शिंदे यांनी शरद पवार व सर्वांचे अभिनंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार, खा. अमोल कोल्हे, मा.आ. विजया चव्हाण, धनंजय मुंडे (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य), जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) यांच्याशी प्रतिभा शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी खा. अनिल देसाई हे देखील उपस्थित होते.