पुणे : प्रेयसीला त्रास देणाऱ्या एका तरुणाचे प्रियकराने गुप्तांग कापण्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरात घडली. या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो तर महिला बचत गट चालवत आहे. महिलेला आर्थिक गरज असल्याने तिने फिर्यादी काम करत असलेल्या फायनान्स मधून कर्ज घेतले होते. परंतु पुन्हा कर्जाची आवश्यकता असल्याने दोघांमध्ये चॅटींग सुरू होते. या चॅटींगच्या संदर्भात आरोपी महिलेच्या प्रियकराला माहिती मिळाली.
मारहाण करून अज्ञातस्थळी नेले
यानंतर प्रियकराने महिलेच्या मोबाईल नंबरवरुन चॅटींग करून फिर्यादीला कात्रज नवीन बोगदा परिसरातील स्वामी नारायण मंदिर येथे बोलावून घेतले. आरोपीसोबत आणखी एक साथीदार होता. या दोघांनी फिर्यादीला मारहाण केली नंतर दुचाकीवर मध्ये बसवून शिंदेवाडी येथील एका सुनसान जागेवर नेले.
गुप्तांग कापून मारहाण केली
फिर्यादीस खाली पाडून त्याला पकडून त्यातील एकाने त्याच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादीचे गुप्तांग कापून त्याच हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्यानंतर त्याला कात्रज परिसरातील एका हॉटेलजवळ सोडले. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंकुश कर्चे करत आहेत.