मुंबई: फाटक्या, मळकट आणि झिजलेल्या चपलांना तब्बल 2 लाख 18 हजार 700 डॉलरची (1 कोटी 77 लाख रुपये) बोली लागली आहे. वाचून धक्का बसला ना. पण हे खरे आहे. तपकिरी रंगाच्या या सँडलवर अनेकांच्या नजरा होत्या. परंतु यातील एकाच भाग्यवानाला या चपला मिळणार आहेत.
आजकाल आपण बघतो अनेक प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव होत आहे. तसेच, टेक क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या वस्तूंचा लिलाव होत आहे. लिलावात होणाऱ्या वस्तूंची बोली खूप जास्त लावली जात आहे. पण, त्यांच्या Birkenstocks सँडलसाठी आश्चर्यकारक बोली लावण्यात आली आहे. या सँडलची खास गोष्ट म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांनी ज्या गॅरेजमध्ये ॲपलची स्थापना केली, त्या गॅरेजमध्ये स्टीव्ह जॉब्स हे सँडल घालत होते.
42 वर्षांपूर्वीच्या सँडल जोडीचा लिलाव
स्टीव्ह जॉब्स यांच्या 42 वर्षांपूर्वीच्या सँडल जोडीचा लिलाव होत आहे. स्टीव्ह जॉब्स ‘ब्राऊन सुड लेदर बर्केनस्टॉक अॅरिझोना सँडल्स’ वापरत असत. त्यांच्या या सँडल्स खूप लोकप्रिय होत्या. जी आता लिलाव करणारी कंपनी ‘ज्युलियन ऑक्शन्स’ च्या अधिकृत वेबसाईडवर लिलावासाठी ठेवली गेली आहे. ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळावर सॅंडलचे फोटोही शेअर करण्यात आलेले आहेत. या फोटोंमध्ये स्टीव्ह जॉब्सचे ब्राउन सँडल खूप जुने दिसत आहेत.
सँडल स्टीव्हच्या सामान्य दिसण्याचा भाग
एका मुलाखतीत स्टीव्ह जॉब्सची पत्नी क्रिसन ब्रेनन यांनी जॉब्सच्या कपड्याच्या, राहण्याच्य शैलीबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, ‘सँडल स्टीव्हच्या साधेपणाचे लक्षण होते. ही त्याच्या साधेपणाची बाजू होती. तुम्हाला सकाळी काय घालायचे, याची चिंता करण्याची गरज पडत नाही.
सँडलमुळे ते स्वतःला उद्योगपती समजत नव्हते
क्रिसन ब्रेनन पुढे अशाही म्हणाल्या होत्या की, स्टीव्ह कधीही इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी काहीही नवीन शोधत नव्हता. अर्थात खरेदी करीत नव्हता. त्यांनी केवळ मनाला जे पटेल किंवा व्यवसायात जे चांगले दिसेल या अनुषंगाने ते कपडे परिधान करित असत. सॅंडलमध्ये त्याला कधीही मोठा व्यावसायिक असल्याचे भाव येत नाही. त्याला सर्जनशील विचार करण्याचे स्वातंत्र्य होते.
अॅपलच्या महत्त्वपुर्ण क्षणी स्टीव्हच्या पायात ही सॅंडल
अॅपलच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या क्षणांमध्ये जॉब्सने या सँडल घातल्या होत्या, असे लिलाव करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. वेबसाईडवर लिहिले आहे की, अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासोबत 1976 मध्ये त्यांच्या लॉस अल्टोस गॅरेजमध्ये ऍपल कॉम्प्युटर लॉंच करताना स्टीव्ह जॉब्स यांनी ही चप्पल घातली होती. ही चप्पल तो अधूनमधून ते घालायचे.