मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यातील 44 नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला असून, यामुळे 1 लाख 21 हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. चालू आर्थिक वर्षात राज्य शासनाने 5 लाख बेरोजगार युवक, युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार मेळाव्यामार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
या क्षेत्रात मिळणार रोजगार
बेरोजगारांच्या हाताल काम मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग पुढाकार घेणार आहे. सरकारच्या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन अशा विविध क्षेत्रात नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. दहावी नापास ते उच्च शिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी या करारानंतर मिळणार आहे .
नोकऱ्या देणारे हात निर्माण करूया
आम्ही फक्त करार करत नाही, तर त्याची अंमलबजावणी करतो. आधी घोषणाच व्हायच्या, आता प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे काम आम्ही करत आहोत. एरवी आर्थिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार पाहिले आहेत. पण खऱ्या अर्थाने मनुष्यबळातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे करार होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.