नवी दिल्ली : तुम्हीही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण, नियमांमध्ये झालेला बदल आणि त्यामुळं होणारे परिणाम थेट तुम्ही स्वत: अनुभवू शकणार आहात. इंडियन ऑयल कॉरपोरेशन लिमिटेडच्या वतीनं आता QR कोड बेस्ड सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. यामुळे गॅस ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरवर क्यूआर कोड असणारे स्पेशल लेबल लावले जाईल. यूनिट कोड-बेस्ड ट्रॅक अंतर्गत पहिल्या टप्प्यात क्यूआर कोडसह एम्बेडेड 20 हजार एलपीजी सिलिंडर वितरीत करण्यात आले आहेत. हा एक प्रकारचा बारकोड आहे. जो डिजिटल डिवाइस द्वारे रीड केला जाईल. पुरी यांनी म्हटले की, येत्या तीन महिन्यात सर्व 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरवर क्यूआर कोड लावण्यात येईल.
गॅस चोरीला आळा बसणार
QR कोड लावण्यामागे सरकारचा उद्देश्य गॅस चोरी रोखणे आणि सुरक्षा प्रदान करणे आहे. इंडियन ऑइलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा गॅस सिलेंडरवर QR कोड बसवले जाईल तेव्हा त्यांचे ट्रॅकिंग सोपे होईल. सध्या ज्या सिलिंडरमध्ये कमी गॅसची तक्रार आहे, तो कोणत्या डीलरकडून आल्याचे सिद्ध करणे कठीण व्हायचे. ते त्या डीलरकडून आले आहे हे माहीत असले तरी ते सिलिंडर कोणत्या डिलिव्हरीमनने दिले हे सांगता येणार नव्हते. मात्र आता सिलेंडरवर क्यूआर कोड टाकल्यास क्षणार्धात सर्व काही कळेल. मग गॅस चोर पकडणे खूप सोपे होईल. जेव्हा चोर पकडला जाण्याची भीती असते तेव्हा तो आपोआप चोरी करणे थांबवतो.
QR कोडचे इतर फायदे
आयओसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, क्यूआर कोडचे इतर फायदे आहेत. यावरून कोणत्या सिलिंडरमध्ये किती वेळा रिफिलिंग केले आहे हे कळेल. तसेच सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर परत येण्यासाठी किती दिवस लागतात, हे देखील समजणे सोपे होईल. जर कोणी घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिकरित्या वापरताना पकडले गेले, तर ते कोणत्या डीलरकडून वितरित केले गेले हे शोधणे सोपे होईल.