मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने येत असलेल्या कारला बोरघाटात एका वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबईच्या दिशेने येत असलेल्या कारला रात्री बारा वाजताच्या सुमारास अपघात झाला. पिंपरी चिंचवड येथे राहणारे कुटुंब मुंबईला जात होते. यावेळी बोरघाटात ढेकू गावाच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. तर दरवाजा मोडल्याने प्रवासी बाहेर फेकले गेले. अतिरक्तस्त्रावामुळे काही जणांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
पोलिसांची घटनास्थळी धाव
महामार्गावरून जात असलेल्या एका कार चालकाने महामार्ग पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरु करण्यात आले. तिघा जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं :
- अब्दुल रहमान खान, 32 वर्षे, घाटकोपर
- अनिल सुनिल सानप
- वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी
- राहुल कुमार पांडे, वय-30 वर्षे, कामोठे, नवी मुंबई
- आशुतोष नवनाथ गांडेकर, 23वर्षे अंधेरी, मुंबई.
पोलिसांकडून अपघाताची चौकशी सुरु
अपघात स्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले इत्यादीने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. मच्छिंद्र आंबोरे वय 38 वर्ष (चालक), अमीरउल्ला चौधरी व दिपक खैराल हे गंभीर जखमी झाले आहेत.