मुंबई : सुपर लाइक नावाच्या ॲपच्या माध्यमातून पार्टटाईम नोकरीच्या नावाखाली देशातील लाखो लोकांची फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी ईडीने फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, धनलक्ष्मी बँक आणि बेंगळुरूमधील इतर कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये या सर्व कंपन्यांच्या 80 बँक खात्यांमधून एक कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुपर लाईक नावाचे ॲप बाजारात आले होते. कंपनीने दावा केला आहे की या अॅपच्या माध्यमातून लोकांना घरी बसून पार्ट टाइम जॉब केल्यास जास्त पैसे मिळतील. यासाठी लोकांना कंपनीच्या ॲपवर नोंदणी करून काही पैसे भरण्यास सांगण्यात आले. यासोबतच त्या ॲपवर कंपनीकडून अनेक सेलिब्रिटींचे फोटोही शेअर केले जात होते. कंपनी संबंधित ग्राहकाला या फोटोंवर कमेंट शेअर करण्यासाठी आणि त्यांची जाहिरात करण्यासाठी पैसे देत होती.
ॲपमध्ये भरलेले पैसे हडपले
सुरुवातीच्या टप्प्यात या ॲपद्वारे ग्राहकांना पैसे दिले जात होते. मात्र, कालांतराने ॲपने ग्राहकांना पैसे देणे बंद केले आणि नोंदणीच्या वेळी ॲपमध्ये भरलेले पैसे ग्राहकांना परत केले गेले नाहीत. या प्रकरणी बेंगळुरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा घोटाळा देशभर असल्याचे समोर आल्यानंतर ईडी त्याची चौकशी करत आहे. या घोटाळ्यामध्ये केवळ सुपर लाइक कंपनीच नव्हे तर ऑनलाइन पेमेंट सुविधा पुरविणारी ॲप आणि काही प्रमुख बँकादेखील सहभागी असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना असून त्या संदर्भात ही छापेमारी झाली आहे.