(राजमुद्रा जळगाव)|जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांमधून सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने भुसावळ येथून सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 14 गुन्ह्यांची कबुली मिळाली असून गुन्ह्यात वापरण्यात येणारी मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तोफिक हुसेन जाफर हुसेन (वय 18) खानका मदरसा, भुसावळ हा भुसावळ शहरात आल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. चोरीचा मुद्देमाल विकत घेणारा सोनार हरिश्चंद्र दत्तात्रय इखनकर (वय 25) राहणार सराफ गल्ली, भुसावळ यासही मुद्देमालासह अटक झाली असून उर्वरित सोहेल अली युसुफ अली व अरबाज अली युसुफ अली दोघे राहणार इराणी मोहल्ला, भुसावळ या दोन जणांच्या अटकेचा प्रयत्न चालू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सदर गुन्हेगाराचे जळगाव, नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील भुसावळ, मालेगाव, लासलगाव, शिरपूर, चाळीसगाव, नंदुरबार, निफाड, सिन्नर शहरांतून सोनसाखळी चोरीचे 14 गुन्हे सिद्ध झाले आहेत. हे गुन्हेगार गुन्हा केल्यावर नातेवाईकांच्या घरी मोटरसायकल सह लपून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले करत आहेत.