नवी दिल्ली : : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जेलमध्ये सत्येंद्र जैन चक्क मसाज करताना दिसत आहेत. यामुळे तिहार तुरुंगात बंदिस्त असलेले सत्येंद्र जैन यांना या ठिकाणी व्हिआयपी उपचार मिळत असून, ते अगदी ऐषारात जीवन जगत असल्याचा आरोप करण्यात येतोय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सत्येंद्र जैन यांच्या या व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन बेडवर पडून काहीतरी वाचताना दिसत आहेत तर एक माणूस त्याच्या पायाला मालिश करताना दिसत आहे. दरम्यान, तिहार तुरुंगातील व्हायरल फुटेजवर जेल प्रशासनाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर, अंमलबजावणी संचालनालय या व्हिडीओ संदर्भात न्यायालयात पोहोचली आहे.
भाजपकडून जोरदार हल्लाबोल
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये गुन्हेगारांसाठी मसाज पार्लर उघडल्याचं भाजपाने म्हटलं आहे. सत्येंद्र जैन व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. जैन यांना जेलमध्ये व्हीव्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. जैन यांना जेलमध्ये पिण्यासाठी मिनरल वॉटर मिळते, असे भाजपाचे हरीश खुराणा यांचे म्हणणे आहे, याचे पुरावेही दिसत आहेत. जैन यांना भेटण्यासाठीही अनेकजण येतात. दुसरीकडे, तिहार जेलच्या सूत्रांनुसार, हा व्हिडिओ तिहार प्रशासनाच्या निदर्शनास आला होता, ज्यावरून संबंधित अधिकारी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
पाच महिन्यापासून जेलमध्ये तरीही मंत्रिपद कायम
भाजपाचे शहजाद पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांना मंत्रीपदावर ठेवलं आहे. सत्येंद्र जैन यांना पाच महिन्यांपासून जामीन मिळालेला नाही. जामीन वारंवार फेटाळण्यात आला आहे. केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआयपी सुविधा मिळाव्यात, त्यांना मसाज मिळावा, आरामात जगता यावे यासाठी त्यांना मंत्री का केलं हे आज समजल्याचं देखील म्हटलं आहे. जणू काही अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये अशा गुन्हेगारांसाठी मसाज पार्लर उघडल्याचंही सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.