जामनेर : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना जामनेर तालुक्यातील एका खेडेगावात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. या पीडीतेवर संशयीत जगदीश अशोक पवार याने गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत तरुणीने पहूर पोलिस स्थानक गाठत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित जगदीश पवार याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.