पुणे : हडपसर भागात मजुरास बेदम मारहाण आणि गुप्तांगावर वार करुन खून केला. या प्रकरणी मयताचा मित्र असलेल्या एका मजुराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण किसन सूर्यवंशी (वय 54, रा. शेवाळवाडी बसथांब्याशेजारी, मांजरी, मूळ रा. कर्नाटक) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत लक्ष्मण अरुण सूर्यवंशी (वय 25) यांनी फिर्याद दिली असून, पिताराम केवट (वय 23, रा. शेवाळवाडी बसथांबाशेजारी, मांजरी, मूळ मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मजूर आरोपीने कुटुंबासह पोबारा केला असून, हडपसर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दारु पिण्यासाठी सोबत गेले
आरोपी पिताराम आणि अरुण सूर्यवंशी हे शेजारी-शेजारी राहत आणि एकाच नर्सरीत कामाला होते. कामावरून घरी आल्यानंतर ते दोघे दारू पिण्यासाठी गेले. त्यानंतर पिताराम हा एकटाच घरी परतला. त्यामुळे मृत अरुण यांच्या कुटुंबीयांनी पिताराम याच्याकडे चौकशी केली असता त्याने मला काही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच रात्री पिताराम हा घरातील सर्व सामान व पत्नीला घेऊन पसार झाला. सूर्यवंशी कुटुंबीयांना त्याच्यावर संशय आल्यामुळे त्यांनी हडपसर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय
पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा मांजरीतील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत अरुणचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिताराम हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. अनैतिक संबंधातून अरुणचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.