मुंबई: महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. श्रद्धा खून प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील अशा अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार अशा हरवलेल्या तरुणी आणि महिलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करत आहे. महिला आयोगाच्या बैठकीत ते बोलत होते.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या सहकार्याने एक विशेष टीम तयार करण्यात येणार आहे. ज्या मुलींचा विवाहानंतर कुटुंबाशी संपर्क तुटला आहे. त्याची सध्याची स्थिती काय आहे? किंवा अशा मुली ज्या त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात लग्न करतात आणि यामुळे त्यांना समस्या येतात तेव्हा ते त्यांच्या पालकांना आणि कुटुंबास सांगू शकत नाहीत, अशा मुली आणि महिलांसाठी ही विशेष टीम उपयुक्त ठरेल.
एकटे पडलेल्या मुलींना पाठिंबा
महिला आणि बालविकास मंत्री म्हणाले, श्रद्धा सारख्या मुलींशी गैरवर्तन केले जात आहे कारण गुन्हेगारांना माहित आहे की त्यांना त्यांचे पालक किंवा त्यांच्या माहेरच्या कोणत्याही सदस्याने पाठिंबा दिला नाही. अशा स्थितीत आपण संबंधित तरुणीसोबत काहीही करून सुटून जाऊ, अशी मनस्थिती असलेल्या लोकांना वाटते. पीडितेच्या मदतीसाठी कोणीही पुढे येणार नाही. अशा मुली आणि महिलांना मदतीची गरज आहे. राज्यात अशी 10 ते 12 प्रकरणांची माहिती आहे. त्यामुळे पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे लोढा यांनी सांगितले.