पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी रात्रीपासून वाऱ्याच्या वेगाने पसरले. सोशल मीडियावर श्रद्धांजलीही अर्पण केली जात आहे. मात्र त्यांच्या पत्नी वृषाली यांनी विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त फेटाळले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली. रात्री उशिरा काही न्यूजपोर्टलवर निधनाची बातमी प्रसिद्ध झाली होती. अभिनेता अजय देवगणनेही श्रद्धांजली वाहणारे ट्विट केल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘विक्रम गोखलेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृपया अफवा पसरवू नये’, असं आवाहन कुटुंबीयांनी केलं आहे.
प्रकृती चिंताजनक
त्यांच्या पत्नी वृषाली यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यात सुधारणा होते आहे की नाही होत आहे की तो प्रतिसाद देत नाही यावरुन डॉक्टर सकाळी काय करायचे ते ठरवलतील.’ अशी प्रतिक्रिया दिली होती. वृषाली यांनी खुलासा केला की, विक्रम गोखलेंना 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘त्यांच्यात थोडी सुधारणा झाली पण पुन्हा तब्येत बिघडली. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. या क्षणी त्यांचे विविध अवयव निकामी झाले आहेत.’