भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भुसावळ पालिकेचे मुख्य अधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवीगाळ केल्याची घटना सोमवार १४ रोजी सायंकाळी घडली होती या प्रकरणात चौधरी यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. चौधरी यांना या गुन्ह्यात मंगळवार पर्यंत अटक करू नये व पोलिसांना तपासात सहकार्य करावे या अटीवर जामीन मंजूर झाले आहे.
दरम्यान रविवारी माजी आ. संतोष चौधरी यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून आपला जबाब नोंदविला आहे. यावेळी वकील जगदीश कापडे, कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती सचिन चौधरी, सतीश घुले, आसिफ खान शेर खान आदी उपस्थित होते. पोलीस ठाण्यात जबाब नोंदविल्या नंतर चौधरी हे बाहेर पडत असतांना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला याप्रसंगी चौधरी म्हणाले, मुख्याधिकाऱ्यांना आपण ओळखत नाहीत पाहिलेले देखील नाही राजकीय आकस दबावापोटी आगामी निवडणुकीवर डोळा ठेऊन आपल्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्या खोट्या गुन्ह्यांना आपण भीक घालत नाही असेही ते म्हणाले.