मुंबई: राज्यात संभाजी भिडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यांमुळं गदारोळ सुरू असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यामुळे आणखी राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने आज (दि.25) शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी रामदेव बाबा महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.
रामदेव बाबा नेमकं काय म्हणाले?
महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे प्रचंड संतापल्या आहेत. महिलांनी काय घालायाचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे. महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठिक आहे. ते मान्य आहे. पण पुढचं विधान कितपत योग्य आहे? रामदेव बाबा डोकं खाली आणि पाय वर करा. तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल. रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. त्यांचं हे विधान घाणेरडं आहे. गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.