मुक्ताईनगर : उभ्या आयुष्यात केवळ विकासाचं राजकारण केले. मतदारसंघात कायम शांतता ठेवली, गुंडागर्दी नावालाही नव्हती मात्र दुर्दैवाने गेल्या तीन वर्षात गुंडागर्दीने डोके वर काढले असून गावा-गावात दारू विक्रीने कहर केल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. आता खोके सरकार असल्याने त्यांना जनसामान्यांशी काही घेणं देणं राहिलं नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.
जनसंवाद यात्रेदरम्यान बोदवड तालुक्यातील मानमोडी येथे ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारवर टिका करीत पवार साहेबांची ताकद वाढवण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी व विकासासाठी साथ द्या, असे आवाहनही केले. मानमोडी येथे फुलांचा वर्षाव करून आणि प्रचंड आतिषबाजी करून जल्लोषात जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीची वाढली ताकद
अॅड.रवींद्र भैय्या म्हणाले की, मतदारसंघात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी हे चित्र आता बदलले असून आता नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने बोदवड तालुक्यात शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निर्माण झाली आहे. यापुढेही कायम अशीच साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अॅड.रोहिणी खडसे म्हणाले की, जनसंवाद यात्रेतून जबाबदारीची जाणीव झाली असून आपले इतकं प्रेम मिळालं की त्या प्रेमाने मी खूप भारावून गेले त्यामुळे माझा पराभव झाला, असे कधी वाटलेच नसल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या 37 दिवशी बोदवड तालुक्यातील मानमोडी, घाणखेडा, सुरवाडे बुद्रुक, सुरवाडे खुर्द येथे आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अॅड.उपाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.